नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप निश्चित झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा झाली. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान उपस्थित होते. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी 17, तर लोक जनशक्ती पक्ष 6 जागांवर निवडणूक लढवेल. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीए गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहांनी बैठकीनंतर व्यक्त केला. तर मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी 2009 पेक्षा अधिक जागा जिंकून दाखवू, असा दावा केला. राज्यसभेच्या पुढील निवडणुकीत रामविलास पासवान यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. 'तिन्ही पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटप करण्यात आलं. लवकरच आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर ठेऊ,' असं शहा यांनी सांगितलं. एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला, तरी अद्याप कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार हे ठरलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी दिली. 'आज जागावाटप निश्चित झालं आहे. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे अजून ठरलेलं नाही. मात्र ते लवकरच ठरेल,' अशी माहिती कुमार यांनी दिली. 'आम्ही बिहारमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. मला गरजेपेक्षा जास्त बोलायची सवय नाही. 2009 मध्ये भाजपा आणि जेडीयूची युती होती. त्यावेळी आम्ही बिहारमध्ये 40 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही त्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.