नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाटणा येथे एनडीएमधील मित्रपक्षांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेजवानीस केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हे अनुपस्थित राहणार आहेत. तर संयुक्त जनता दलाकडूनही जागावाटपामध्ये 25 जागांसाठी आग्रह होत असल्याने राज्यात एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे आठ वर्षांनंतप बिहारमध्ये एनडीएमधील मित्र पक्ष एकत्र येणार आहेत . पाटणा येथील ज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एनडीएमधील घटक पक्षांचे नेते संबोधित करणार आहेत. मात्र उपेंद्र कुशवाहा यांची अनुपस्थिती या बैकठीमध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. तसेच जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी जेडीयू राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाला 25 जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. जर एनडीएला नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाचा लाभ हवा असेल तर त्यांना जेडीयूसोबत न्याय करावा लागेल, असा आग्रह रजक यांना धरला आहे. पोटनिवडणुकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवांच्या पार्श्वभूमीवर पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी एनडीएची बैठक झाली पाहिजे आणि भाजपाने राज्यातील मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली पाहिजे., असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकसमाज पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी दिला होता. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून, लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत भाजपा, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता संयुक्त जनता दलही एनडीएमध्ये सहभागी झाल्याने बिहारमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारमधील एनडीच्या घटक पक्षांकडून जागावाटपाचा आराखडा तयार करण्यासाठी भाजपावर दबाव आणण्यात येत आहे.