NDA vs INDIA Opposition Meeting : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी आज बंगळुरुत विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी ऐक्याला नवीन नाव देण्यात आले आहे. पूर्वी UPA नावाखाली एकत्र येणारे विरोधक आता INDIA या नावाखाली एकत्र येत आहेत. बैठकीनंतर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
पुढील बैठक मुंबईतभाजपविरोधातील आघाडीला INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) नाव देण्यात आले आहे. बंगळुरुमध्ये 26 विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर एकाच व्यासपीठावर येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांनी या आघाडीच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी त्यांनी आजची बैठक यशस्वी झाल्याचे सांगून पुढील बैठक मुंबईत होणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय, 11 जणांची समितीही स्थापन होणार आहे. या समितीत कोण असेल, हे लवकरच ठरवले जाईल.
खर्गेंची भाजपवर टीकायावेळी खर्गेंनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, एनडीए 30 पक्षांसोबत बैठक घेत आहे. मी भारतात इतके पक्ष कधीच ऐकले नाहीत. आधी त्यांनी एकही सभा घेतली नाही पण आता ते एकामागून एक बैठका घेत आहेत. पंतप्रधान मोदी आता विरोधी पक्षांना घाबरले आहेत. आज संपूर्ण मीडियावर पंतप्रधान मोदींचा ताबा आहे. त्यांच्या आदेशानेच सर्वकाही होते. आज विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. माझ्या 52 वर्षांच्या कारकिर्दीत मी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत, असं खर्गे म्हणाले.