नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले असून, यातून निकालांचे कल जाणून घेतले आहेत. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीतल्या सातही जागांवर भाजपाचं कमळ फुलणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेल्या राज्यांत भाजपाला भरभरून जागा मिळण्याची शक्यता आहे.राजस्थानमध्ये भाजपाला 25पैकी 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात. तर दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भाजपाला 11 जागांपैकी 7 ते 8 जागा मिळणाची शक्यता आहे. तर काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातल्या 29 जागांपैकी भाजपाला 26-28 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळण्याचा कयास आहे.गुजरातमध्ये मोदी लाट कायम असून इथे 26पैकी 25 जागा एनडीएला मिळू शकतात. तर गोव्यातील दोन जागाही भाजपा राखण्याचं एक्झिट पोलमधून सांगण्यात आलं आहे. 6 राज्यात एनडीएला 130 जागा मिळण्याचा अंदाज असून, यूपीए 10 जागांवर मर्यादित राहणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
Lok Sabha 2019 Exit Poll: 6 राज्यांत NDA आघाडीवर राहणार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 8:05 PM