मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरने एका वाहिनीवर दाखवलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपा अनेक जागा गमावणार आहे. तर महाआघाडी दक्षिण भारतात बाजी मारण्याची शक्यता आहे.
सी व्होटरने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दक्षिण भारतातील सर्व राज्य आणि ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये जनतेचा कल जाणून घेतला. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये देशातील सर्व मोठ्या राज्यांचा कौल जाणून घेण्यात आला.
यानुसार एनडीएला 543 पैकी 247 जागा मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला 171 जागा मिळत आहे. याशिवाय, इतरांना 125 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, काँग्रेसकडून ज्या महाआघाडीचा प्रयत्न सुरु आहे, त्याबद्दलही लोकांचे मत या सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतले आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण, मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेले महाआघाडीतील पक्ष काँग्रेससाठी विजयाचा मार्ग सुकर करु शकतात.
महाराष्ट्रात काय होणार?राज्यातील एकूण 48 जागांपैकी एनडीएला फक्त 18 जागांवर विजय मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला तब्बल 30 जागा मिळताना दिसत आहेत. राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली नाही तर भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचे विभाजन टाळण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. एनडीए – 18यूपीए – 30एकूण – 48
गुजरातमधील कौल...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये एनडीएला चांगला फायदा होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. या सर्व्हेनुसार, एनडीएला 24 जागा मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला दोन जागा मिळत आहेत.एनडीए – 24यूपीए – 02एकूण – 26
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कौल...गेल्या या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला होता. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. यापैकी एनडीएचा 47 जागांवर विजय होताना दिसतोय. तर यूपीएला 18 जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात एनडीएला 23 तर यूपीएला 06 जागा मिळणार आहेत. राजस्थानमध्ये एनडीएला 19 तर यूपीएला 06 आणि छत्तीसगडमध्ये एनडीएला 05 तर यूपीएला 06 जागा मिळणार आहेत.
बिहारमध्ये होणार एनडीएला फायदा या सर्व्हेनुसार, बिहारमधील 40 जागांपैकी एनडीएला तब्बल 35 जागा मिळत आहेत. तर यूपीएला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशात काय होईल?या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांची युती न झाल्यास एकूण 80 जागांपैकी 72 जागा भाजपाला मिळतील. तर सपाला चार आणि बसपाला दोन, तर काँग्रेसला दोन जागा मिळतील. याशिवाय सपा आणि बसपा एकत्र आल्यास एनडीएला सपाटून मार खावा लागणार आहे. सपा-बसपाला एकूण 50 जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला 28 आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील.
दक्षिणेकडील राज्यातील परिस्थिती...तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यातील जनतेने भाजपाला बहुमतापासून लांबच ठेवलं आहे. या पाच राज्यातील एकूण 129 जागांपैकी तब्बल 80 जागा यूपीएच्या वाट्याला जाताना दिसत आहेत. एनडीए 15, तर इतरांच्या खात्यात 34 जागा जात आहेत.
ईशान्येकडील राज्यांत...अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये एनडीएसाठी खुशखबर आहे. या सात राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 27 जागा आहेत. एनडीएला यापैकी 18 तर यूपीएला चार आणि इतरांच्या खात्यात दोन जागा जाताना दिसत आहेत.
पश्चिम बंगाल आणि ओडिसामधील चित्र...सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागांपैकी एनडीएच्या वाट्याला केवळ नऊ जागा येत आहेत. तर यूपीएला एक आणि ममतांच्या टीएमसीला 32 जागा मिळत असल्याचे चित्र आहे. तर ओडिसामध्ये एनडीएलाला चांगला फायदा होणार असल्याचे दिसते. आडिसामध्ये एकूण 21 पैकी एनडीएला 15, तर राज्यातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलला सहा जागा मिळताना दिसत आहेत.