Chirag Paswan : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांना विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएतील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एक मोठा दावा केला आहे. चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
चिराग पासवान म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएचा निकाल पाहून आम्ही नैतिकदृष्ट्या भारावून गेलो आहोत. आम्ही बिहारच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उत्साहाने सहभागी होणार आहोत. दिल्लीत एनडीएला मिळालेला विजय हाच आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्ली, हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांप्रमाणेच बिहारमध्येही असेच निकाल दिसतील.
पुढे चिराग पासवान यांनी सांगितले की, बिहारमध्ये आमची युती मजबूत आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, अशा ५ पक्षांमध्ये विजयी युती आहे. मी सतत बिहारला भेट देत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही २२५ हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू. तसेच, इतर एनडीएतील पक्षांनाही तोच विश्वास आहे, असे चिराग पासवान म्हणाले.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार येईल - गिरीराज सिंहदुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही बिहारमध्ये एनडीए युती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा दावा केला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचे सरकार आहे आणि फक्त एनडीएचे सरकारच स्थापन होईल. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.