नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक यावर्षीच्या शेवटी होणार आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी आतापासूनच भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजप-लोजपा युतीला 200 जागा मिळतील, अशी भविष्यवाणी नितीश कुमार यांनी केली आहे.
पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नितीश कुमार यांनी हा दावा केला आहे. बिहारमध्ये धर्म, जात आणि लिंगाच्या आधारे कोणाशीही भेदभाव होणार नसल्याची ग्वाही नितीश यांनी दिली. तसेच ज्या विचारांवर पक्ष चालत आहे, त्या विचारांशी कधीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नितीश कुमार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांकडे काहीही मुद्दा नसून ते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाचा झेंडा आपल्या घराच्या छतावर लावण्याच्या सूचना केल्या. मागील 15 वर्षांच्या काळात जे काम झालं त्याचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असंही नितीश कुमार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नितीश कुमार यांनी बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीए जिंकेल असा दावा केला होता. त्यांचा दावा बऱ्याच प्रमाणात खरा ठरला होता. एनडीएने येथे 40 पैकी 39 जागांवर विजय मिळव होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या त्यांच्या अंदाजाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.