जम्मू : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(रालोआ) वादग्रस्त भूसंपादन विधेयक शेतकरीविरोधी आहे व त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक कधीही संमत होणार नाही, असे जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष शरद यादव रविवारी म्हणाले.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी भूसंपादन विधेयकाच्या निमित्ताने मोदी सरकारवर तोफ डागली. हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध आहे. ते राज्यसभेत संमत होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असेल. विरोधक एकजुटीने हे विधेयक हाणून पाडतील, असे यादव म्हणाले.सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने मोठे उद्योगपती, कार्पोरेट व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित पाहिले. आता मोदी सरकार गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावून ती बड्या उद्योगपतींच्या घशात घालू पाहत आहे; पण आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. (वृत्तसंस्था)