एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:58 AM2023-07-07T07:58:07+5:302023-07-07T07:58:20+5:30
१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी
- संजय शर्मा
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या महागठबंधनाला उत्तर देण्यासाठी व एनडीएची ताकद आणखी वाढविण्यासाठी १८ जुलै रोजी दिल्लीत एनडीएची मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. एनडीएच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात या बैठकीकडे पाहिले जात आहे.
एनडीएच्या या शक्तिप्रदर्शनात अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिरोमणी अकाली दल, तेलुगू देसम पार्टी, लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, राष्ट्रीय लोक जनता दलाचे उपेंद्र कुशवाह, सुभासपाचे ओमप्रकाश राजभर यांच्यासह अन्य राजकीय पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे २०२४च्या तयारीच्या रोड मॅपवर काम करीत आहे. विरोधकांच्या १८ राजकीय पक्षांच्या महागठबंधनला उत्तर देण्यासाठी त्यांच्या तुलनेत आपली शक्ती वाढविण्यासाठी अन्य पक्षांना एनडीएमध्ये सहभागी करण्याच्या रणनीतीवर काम करीत आहे.
बैठकीला कोण येणार?
१८ जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये एनडीएची मोठी बैठक होईल. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिरोमणी अकाली दल, तेलुगू देसम पार्टी, लोजपा चिराग पासवान गट, सुभासपा नेते ओमप्रकाश राजभर, रालोजदचे कुशवाह यांना औपचारिकरीत्या एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यात येईल.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे हेच ध्येय...
बैठकीत संघटना मजबूत करणे आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदींना सलग तिसर्यांदा पंतप्रधान म्हणून सत्तेत आणणे, हे आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. भाजप केवळ निवडणुकीपूर्वीच तयारी करत नाही तर वर्षभर लोकांच्या संपर्कात राहतो, असे भाजपच्या आसाम युनिटचे प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले.
१२ राज्यांतील १४२ जागांवर लक्ष
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पूर्व आणि ईशान्य भारतातील १२ राज्यांतील १४२ जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी येथे बैठक झाली. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, हिमंता विश्व शर्मा, माणिक साहा, खासदार, आमदार उपस्थित होते. १२ राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण १४२ जागा आहेत, त्यापैकी २०१९ मध्ये भाजपने ६८ जागा जिंकल्या होत्या. या १४२ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी घडामोडी
२० जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एनडीएची ही बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या बैठकीत एनडीएच्या नेत्यांना डिनर देणार आहेत.महाराष्ट्रातील राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट आधीपासूनच भाजपबरोबर युतीत आहे. बिहारमध्येही चिराग पासवान व उपेंद्र कुशवाह हे एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत. आंध्र प्रदेश व तेलंगणामधील तेलुगू देसम पार्टीही यात सहभागी होणार आहे. उत्तर प्रदेशातील अपना दल आधीपासूनच एनडीएमध्ये आहे. सुभासपाही सहभागी होऊ शकते. अशाच प्रकारे पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचे भाजपशी जुनी युती होती. शेतकरी आंदोलनामुळे ती तुटली होती. आता दोन्ही पक्ष पुन्हा पंजाबमध्ये मिळून निवडणूक लढवू शकतात.