नवी दिल्ली : दिल्लीतीत ऐतिहासिक रामलीला मैदानाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर येत्या 30 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानाचे नाव बदलण्यासाठी सुरुवातीला प्रस्ताव संबंधित महानगरपालिकेच्या नेमिंग कमेटीकडे जाईल. या नेमिंग कमेटीमध्ये महापौर आणि विरोधी नेत्यासह सहा सदस्य यावर चर्चा करतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त प्रस्ताव दाखल करणा-यांना सदस्यांना कारण विचारतील. त्यानंतर आयुक्तांच्या अहवालानंतर नेमिंग कमिटी नाव बदलण्याचा निर्णय घेतील.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले, भारतामध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जगभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी छत्तीसगडने आपल्या नव्या राजधानीला अटलजींचे नाव देण्याची काल घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता 'अटलनगर' असे करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी छत्तीसगड निर्मिती दिन साजरा केला जाणार आहे, या दिनाचे औचित्य साधून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव विविध ठिकाणी देण्यात येणार आहे. यात महाविद्यालय, शाळा, रेल्वे मार्ग, शहर, आदींचा यात समावेश असणार आहे.