ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - भारतातले लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने आणखी दोन चॅनलवर बंदी घातली आहे. 'न्यूज टाइम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे. 'न्यूज टाइम आसाम'वर प्रोग्रॅमिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे. 'न्यूज टाइम आसाम'नं एका अल्पवयीन मुलीचा परिचय देताना तिची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याचा ठपका ठेवत तब्बल 7 दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. तत्पूर्वी 9 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपासून 24 तासांसाठी एनडीटीव्ही इंडिया या चॅनलचं प्रसारण बंद असणार आहे. पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशा प्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारं असल्याचा ठपका एनडीटीव्हीवर ठेवण्यात आला होता. आता 9 नोव्हेंबरला एकंदरीत तीन चॅनलवर बंदी असणार आहेत. मात्र चॅनलवर अशा प्रकारे बंदी घातल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय घाला घालत असल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जातं आहे.
'एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी
By admin | Published: November 06, 2016 8:35 AM