नवी दिल्ली: नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. विशेष म्हणजे निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली. गेल्या दोन्ही लोकसभांच्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची (खासदारांची) संख्या जास्त आहे. याशिवाय गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची संख्यादेखील वाढली आहे.यंदाच्या लोकसभेतील 539 सदस्यांच्या शपथपत्रांमधील माहिती विचारात घेतल्यास, त्यातील 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. 2009 च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचं प्रमाण 44 टक्क्यांनी वाढलं आहे. केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहेत. सदोष मनुष्यवध, चोरी यांच्यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश दाखल आहे. गेल्या दोन्ही लोकसभांच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी सदस्यांचं प्रमाण वाढलं आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी सदनातील 185 (34 टक्के) सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले होते. तर 2009 मध्ये हेच प्रमाण 162 (30 टक्के) होतं. मात्र यंदा हे प्रमाण जवळपास निम्म्यावर पोहोचलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे जवळपास 159 सदस्यांवर (29 टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे. एनडीएतील घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे 80 टक्क्यांहून अधिक खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. संयुक्त जनता दलाचे 13 उमेदवार निवडून गेले. यातील 81 टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. काँग्रेसच्या 51 पैकी 29 (57 टक्के) खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे. द्रमुकचे 23 पैकी 11, तृणमूलचे 22 पैकी 9, तर भाजपाचे 301 पैकी 116 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.
नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:23 PM