नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi) देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून उत्साहात साजरा करत आहे. हे वर्ष विशेष बनविण्यासाठी मोदी सरकारने जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
तीन टप्प्यांत होणार सुटका - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने (Narendra Modi) देशभरातील कारागृहांमध्ये असलेल्या काही श्रेणीतील कैद्यांना 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुटका तीन टप्प्यांत करण्यात येईल.
पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2022 -या योजनेत पहिला टप्पा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी असेल. त्या दिवशी काही श्रेणीतील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल. दुसरा टप्पा 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त असेल. तर तिसरा आणि अखेरचा टप्पा 15 ऑगस्ट 2023 रोजी असेल. या दिवशीही अनेक कैद्यांना माफी मिळेल आणि त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येईल.
खरे तर, कारागृहात चांगले आचरण असणाऱ्या कैद्यांना प्रोत्साहन देणे, असा या योजनेचा उद्देश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष योजनेत गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना माफी मिळणार नाही. त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागेल.