ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेली आगळीक आणि चीनची वाढत असलेली सैन्यशक्ती या पार्श्वभूमीवर देशाची हवाई आघाडी भक्कम करण्यासाठी किमान 200 लढाऊ विमानांची गरज असल्याचे मावळते हवाईदल प्रमुख अरुप राहा यांनी सांगितले.
अरुप राहा हे येत्या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी भारतील हवाई दलाच्या क्षमतेबाबत निरीक्षण नोंदवताना राहा म्हणाले, "36 राफेल विमाने ही संरक्षणासाठी पुरेशी नाहीत. तर देशाच्या सुरक्षेसाठी किमान 200 ते 250 विमानांची आवश्यकता आहे."
राहा यांनी पुढे सांगितले की, "भारताकडे सध्या पुरेशा प्रमाणात हेवीवेट विमाने आहेत. या गटातील Su30 MKI विमाने पुढील 30 ते 40 वर्षे सेवा देऊ शकतात. तसेच लाइटवेट वर्गातील विमानांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या काळात राफेल विमाने सर्वोत्तम असून, ती बहुपयोगी आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा प्रभावी वापर होऊ शकतो. पण अशी केवळ 36 विमानेच आपण मागवली आहेत. मात्र त्याहुन अधिक विमानांची गरज भारतीय हवाई दलाला आहे.