डेहराडून : पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. भारतीय सैन्य अकादमीच्या उत्तीर्ण झालेल्या जवानांना संबोधित करताना ते शनिवारी बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले की, अनेक युद्धात भारताकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे. पाकिस्तानात कट्टरवादी एवढे मजबूत आहेत की, राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी बसलेले लोक त्यांच्या हातचे बाहुले आहेत. इतिहास याचा साक्षीदार आहे की, भारताच्या भूप्रदेशासंबंधी महत्त्वाकांक्षा राहिलेल्या नाहीत. आपल्या शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांवर आमचा भर असतो; पण पाकिस्तानसारख्या शेजारी देशापासून आम्हाला सतर्क राहायला हवे.
राजनाथ सिंह यांनी ९/११ आणि २६/११ तील म्होरके पाकिस्तानात असल्याकडेही लक्ष वेधले. चीनसोबत डोकलाममध्ये निर्माण झालेल्या वादाच्या वेळी संयम दाखविल्याबद्दल त्यांनी भारतीय सुरक्षा दलाचे कौतुक केले.
सशस्त्र दलात सहभागी झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, आपल्या प्रशिक्षणाने केवळ आपल्याला शक्ती दिली नसून आपल्या जीवनालाही नवा अर्थ दिला आहे. या भागातील वाहतूक कमी करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आयएमएच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य परिसराला जोडणाºया दोन अंडरपासच्या निर्मितीची घोषणा केली. या योजनांसाठी ३० कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे.