ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही वाटेल ते करण्यास तयार आहोत असे आश्वासनही त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांना दिले आहे.
सोमवारी दिल्लीत अल्पसंख्यांक आयोगाचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात विविध अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधी सहभागी झाले. या संमेलनात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. संघाने मदर तेरेसा यांच्या सामाजिक कार्यामागे धर्मांतराचा हेतू असल्याचा वादग्रस्त दावा संघाने केला होता. यापार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण धर्मांतर केल्याशिवाय समाज कार्य करु शकत नाही का, धर्मांतराची गरजच काय, या सर्व मुद्द्यावर आपण खुली चर्चा का करत नाही असे असंख्य प्रश्नच त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींसमोर उपस्थित केले. धर्मांतरासंदर्भात केंद्र सरकारसोबतच समाजाचीही काही जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत जाऊन आपण त्या देशाची ओळख पुसू शकत नाही, मग आपण भारताची ओळख का बदलायची असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.