ऑनलाइन लोकमत
लाओस, दि. 8 - केवळ दहशतवाद्यांना नाही तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या देशाला एकटं पाडलं पाहिजे, तसंच त्या देशावर कडक निर्बंध घातले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे थेट नाव न घेता मांडली आहे. मोदी 14व्या इंडो-आसियान परिषदेमध्ये बोलत होते. "आमच्या शेजारच्या एक राष्ट्राची जी काय स्पर्धात्मकता आहे ती दहशतवाद पसरवण्यामध्ये आहे. मात्र, आता वेळ आली आहे की, या देशाला वाळित टाकावं आणि दहशतवाद पसरवणाऱ्या या देशावर कडक निर्बंध घालावेत," असे पंतप्रधान म्हणाले.
"केवळ दहशतवादी नाही तर त्यांना मदत करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला लक्ष्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खुल्या समाजासाठी दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला एकत्रितपणे करायला हवा. राष्ट्राची भूमिका म्हणून जे दहशतवादाला प्रोत्साहन देतात, त्यांच्याविरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करायला हवी," असे सांगत मोदींनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला आहे.
दुसऱ्याप्रती द्वेषाची भावना आणि त्यापोटी होणारा हिंसाचार देखील समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेच्या गोष्टी असल्याचे मोदी म्हणाले.
India & ASEAN…a bond of eternal friendship & a shared commitment to prosperity & stability. pic.twitter.com/OALSmxqZvN— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2016