एम. व्यंकय्या नायडू
संस्कृत, पाली, प्राकृत, अरेबिक, पर्शियन, तेलुगु, कन्नड, उडिया आणि मल्याळम या भाषांच्या विद्वानांनी त्यांच्या भाषेचे रक्षण आणि विकासासाठी जे कार्य केले त्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींचा पुरस्कार देऊन त्यांचा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मला समाधान वाटले. हा कार्यक्रम मानव संसाधन मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला होता. आपल्या देशातील भाषांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्याचे काम केल्यामुळे आपला भूतकाळ आणि वर्तमान काळ जोडण्याचे काम या विद्वानांनी केले आहे.
प्राचीन महान कवी आचार्य दंडी यांनी म्हटले आहे की, भाषांचा दीप जर अस्तित्वात नसता तर आपण अंध:कारात चाचपडत राहिलो असतो. भाषा हे बौद्धिक आणि भावनिक अभिसरणाचे साधन असते. संस्कृती, विज्ञान आणि जागतिक दृष्टिकोनाचे वहन करण्याचे ते वाहन असते. तो एक अदृश्य धागा असतो जो आपल्या वर्तमानाला भूतकाळाशी बांधून ठेवत असतो. त्यातूनच मानवाचा विकास होतो आणि त्याच्या सातत्यपूर्ण वापराने भाषेचे पोषण होत असते. आपला भाषिक वारसा जपला पाहिजे असे मी नेहमी म्हणत आलो आहे. आपल्या भाषा या आपल्या इतिहासाचे, परंपरांचे आणि सामाजिक विकासाचे अविभाज्य अंग आहेत. आपली ओळख, आपल्या परंपरा आणि पद्धती यांची अभिव्यक्ती भाषेद्वारा होत असते. आपसातील संबंध दृढ करण्याचे कार्यसुद्धा त्याद्वारे होत असते. आपले राष्ट्र हे बहुभाषिक राष्ट्र आहे. येथे १९,५०० भाषा आणि बोली अस्तित्वात आहेत. पण देशातील ९७ टक्के लोक मान्यताप्राप्त २२ भाषांमधील एखाद्या भाषेतून संवाद साधत असतात. आधुनिक भारतीय भाषांची मुळे प्राचीन असून अभिजात भाषांतून त्यांचा उगम झालेला आहे. अनेक भाषांची स्वत:ची समृद्ध साहित्य परंपरा आहे. त्यातही संस्कृत ही सर्वात प्राचीन इंडो-युरोपियन भाषा असून तिच्या अस्तित्वाचे पुरावे ख्रिस्तपूर्व दोन हजार पूर्वीपर्यंत उपलब्ध आहेत.
भारतीय भाषातज्ज्ञ विल्यम जोन हे १७८६ मध्ये म्हणाले होते, ‘‘संस्कृत भाषेचे प्राचीनत्व कितीही जुने का असेना, पण ती एक अद्भुत भाषा आहे. ती ग्रीक भाषेपेक्षा अधिक शास्त्रीय आहे. लॅटिनपेक्षा ती अधिक समृद्ध आहे आणि दोन्ही भाषांपेक्षा अधिक परिष्कृत आहे. पण दोन्ही भाषा या तुलनेने व्याकरण समृद्ध आहेत.’’ अॅमस्टरडॅम विद्यापीठाचे रेन्सबोड यांनी म्हटले आहे की, ‘‘भाषेचा इतिहास हा प्लेटो किंवा अॅरिस्टॉटल यांच्यापासून सुरू होत नसून त्याचा आरंभ भारताचे व्याकरणकार पाणिनी यांच्यापासून होतो.’’ काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा त्यांच्या प्राचीन साहित्यिक वारशामुळे देण्यात आला आहे. उदाहरणार्थ तामीळ साहित्याचा आरंभ ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांइतका जुना आहे. कन्नड भाषेचा आरंभ ख्रिस्तपूर्व ४५० वर्षांचा आहे. मल्याळमचा इ.स. ११९८ चा तर उडियाचा इ.स. ८०० चा आहे. या सर्व भाषांचा साहित्यिक वारसा समृद्ध आहे. तामीळ भाषेचा वारसा, संगम आणि थोला कप्पियमपासून आहे. तेलुगूचा वारसा कवित्रयमच्या आंध्र महाभारतम्पासून आहे. मल्याळम्चा चिरामनच्या रामचरितम्पासून आहे. कन्नडचा अमोघवर्षाच्या कविराजमार्गपासून आहे आणि उडियाचा खारवेलाच्या शिलालेखापासून आहे. या अभिजात भाषा आपल्या भूतकाळाचे दर्शन घडवितात. त्या वेळच्या परंपरा, मूल्ये आणि ज्ञान यामुळे आपल्या तत्कालीन कवी, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक आणि सम्राटांच्या प्रतिभांचे दर्शन घडते.
आपण या परंपरांचे रक्षण केले नाही तर या खजिन्याची किल्लीच आपण हरवून बसू. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, अंदाजे ६०० भाषा या विस्मृत होण्याच्या अवस्थेत आहेत. गेल्या ६० वर्षांत २५० हून अधिक भाषा लुप्त झाल्या आहेत. अशा तºहेने एखादी भाषा लुप्त होते तेव्हा तिच्यासोबत संपूर्ण परंपराच लुप्त होते. ही स्थिती आपण होऊ देता कामा नये. आपल्या भाषांसह आपल्या परंपरांचे रक्षण करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य ठरते. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यांचा प्रचार करणे याची आजच्या आधुनिक काळात खरी गरज आहे. भाषिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी लागणारी साधने आज अनेक भारतीय भाषांजवळ उपलब्ध नाहीत. ती तूट भरून काढण्यासाठी भारतीय भाषांचा भाषिक डेटा कॉन्सोर्टियम २००८ साली निर्माण करण्यात आला. तो गेल्या ११ वर्षांपासून भाषिक साधनांची जुळवाजुळव करण्याचे काम सगळ्या भाषांसाठी करीत आहे. या डेटाचे वितरण करण्याचे केंद्रदेखील सुरू झाले आहे. त्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण भाषिक संसाधनांची निर्मिती केली जात आहे. भाषेच्या संरक्षण आणि विकासासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे. त्याचा आरंभ प्राथमिक शाळांपासून व्हायला हवा. त्यासाठी किमान एका भाषेत तरी क्रियात्मक साक्षरता आणावी लागेल.अनेकानेक लोकांनी मातृभाषेचाच वापर केला पाहिजे. तसेच अधिक लोकांनी कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली पाहिजेत जे आपल्या भाषेतून लेखन करतात, संवाद करतात, त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे. भारतीय भाषांतील पुस्तकांचे आणि मासिकांचे प्रकाशन करण्यास आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांसाठी बालवाङ्मयाची निर्मिती केली पाहिजे. एकूण विकासासाठी भाषा ही प्रेरक ठरली पाहिजे. त्यादृष्टीने भाषेचे संवर्धन हे उत्तम प्रशासनाचा भाग बनले पाहिजे.
(लेखक आपल्या भारत देशाचे उपराष्ट्रपती आहेत )