नवी दिल्ली : बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज निर्माण झाली आहे, असे मत उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता एक ऐच्छिक विषय म्हणून समाविष्ट केला आहे. तथापि, पूर्ण पदवी अभ्यासक्रम अजून देशात कुठेच शिकविला जात नाही.पिअर्सन प्रोफेशनल प्रोग्राम्सचे (पीपीपी) उपाध्यक्ष वरुण धामिजा यांनी सांगितले की, डिजिटल युगाच्या विस्ताराबरोबर व्यावसायिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. अनेक उद्योग आणि रोजगारांत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी घटक ठरत आहे. आगामी काळात प्रत्येक उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असून, उद्योग व स्मार्टफोन क्रांतीत मोठा तंत्रज्ञानात्मक बदल त्यातून दिसून येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण अधिक केंद्रित आणि सहज उपलब्ध होईल, असे करणे ही काळाची गरज आहे.बिर्लासॉफ्टचे मुख्य लोकाधिकारी समित देब यांनी सांगितले की, विद्यापीठांत तसेच कुशल कर्मचाऱ्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित अभ्यासक्रमांची प्रचंड मागणी आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.अबुधाबीत जगातील पहिलेकृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठसंयुक्त अरब आमिरातीने गेल्या महिन्यात अबुधाबी येथे जगातील पहिले ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ’ स्थापन केले आहे. ‘मोहंमद बिन झायेद युनिव्हर्सिटी आॅफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एमबीझुआई), असे या विद्यापीठाचे नाव असून, तेथे पदवी अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठीही तेथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. पुढील वर्षी २० सप्टेंबरपासून तेथे वर्ग सुरू होणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेत पदवी अभ्यासक्रमांची गरज; उद्योग, शिक्षण क्षेत्रांतील जाणकारांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 6:10 AM