बेगुसराय - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत योगगुरू रामदेब बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात यावे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला होता. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी रामदेव बाबांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ''रामदेव बाबांच्या वक्तव्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तसेच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे.'' असे गिरिराज सिंह यांनी सांगितले.
लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 1:37 PM