कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटने देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिअंटपेक्षा तिप्पटीने जास्त वेगवान असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये ओमायक्रॉनच्या वेगाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव रस्ता आहे का? सरकारला तिसऱ्या डोसवर विचार केला पाहिजे का? या प्रश्नांवर एक्सपर्ट काय म्हणतात जाणून घेऊया.
इंन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, कोरोना लस कोणत्याही व्हेरिअंटविरोधात सुरक्षा प्रदान करते. म्हणजेच कोरोना लस घेतलेला व्यक्ती लस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त सुरक्षित आहे. मात्र, संपूर्ण सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. ज्यांनी एक डोस घेतला आहे त्यांनी लवकर दुसरा डोस घ्यावा. देशात अद्यापही १५ टक्के असे लोक आहेत, ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही. बुस्टर डोसपेक्षा लसीकरण न झालेल्या लोकांना लस देणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनवर काय प्रतिक्रिया?ओमायक्रॉन लस घेतलेल्या लोकांवर परिणाम करत आहे. अशामुळे लग्न समारंभ, पार्ट्या, बाजारातील गर्दी लोकांना पुन्हा एकदा संकटात टाकण्याची शक्यता आहे. यावर व्हायरॉलॉजिस्ट डॉ. दीपक आचार्य म्हणाले की, ओमिक्रॉनला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. यापेक्षा लोकांनी व्यक्तीगत रुपाने स्वत: सतर्क रहायला हवे. विनाकारण घरातून बाहेर पडू नये. लॉकडाऊनपेक्षा तुम्ही घेतलेली काळजीच तुम्हाला वाचविणार आहे.
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी याबाबत सांगितले की, 'कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्याने लोकांना घाबरण्याची गरज नाही. त्याचे नवे रुग्ण सापडणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. असे केल्याने आपण त्याचा समाजात प्रसार होण्यापासून रोखू शकतो. हा धोका टाळण्यासाठी चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावा. बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही डबल मास्क घालू शकता. याशिवाय ज्या लोकांनी लसीचा डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी.
डॉ.राहुल म्हणाले की, आरोग्यासोबतच आपली अर्थव्यवस्थाही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देशात फ्लाइट किंवा कॅबने प्रवास करू शकता, पण त्यादरम्यान तुमची सामाजिक जबाबदारी लक्षात ठेवा. जर तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर त्वरित चाचणी करा. जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर स्वतःला क्वारंटाइन करण्यात अजिबात उशीर करू नका. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली तर लॉकडाऊन किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची गरज भासणार नाही.