शियामेन : दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ब्रिक्स देशांनी संघटित आणि समन्वयित कृती करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिक्स व्यापार चर्चासत्रात प्रतिपादित केली. ब्रिक्सच्या नेतृत्वाला जागतिक पातळीवरील स्थित्यंतराशी मेळ साधता यावा यासाठी त्यांनी उत्कृष्ट दहा कटिबद्धताही सुचविल्या.ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनने आयोजित केलेल्या ‘ब्रिक्स उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसन देशांचा संवाद’ या चर्चासत्रात मोदींनी विकसनशील देशांच्या विकासात भारताचा सहभाग राहील असे आश्वासनही दिले. आम्ही जे काही करू त्याचा जागतिक स्थैर्यावर निश्चितच प्रभाव पडेल. ब्रिक्सच्या माध्यमातून चांगल्या जगाची निर्मिती करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले. पुढील दशक हे ‘सुवर्ण दशक’ राहणार असून येत्या दहा वर्षांत ब्रिक्सला जागतिक स्थित्यंतराचे सुकाणू हाती घ्यायचे आहे, असे मी ब्रिक्स परिषदेत बोललो आहे. सकारात्मक दृष्टिकोन, धोरण आणि कृतीतून हे उद्दिष्ट गाठता येईल, असे त्यांनी नमूद केले. ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश तसेच इजिप्त, ताजिकिस्तान, थायलंड, मेक्सिको आणि केनिया या पाच पाहुण्या देशांचे नेते यावेळी उपस्थित होते. हे सर्व देश भारताचे निकटस्थ आणि मौल्यवान भागीदार देश आहेत. सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने या देशांशी वैचारिक आदान- प्रदान झाल्यामुळे मी आनंदी आहे. या देशांना एकत्र आणल्याबद्दल मी चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)निम्म्या जगाचे प्रतिनिधित्व...ब्रिक्स निम्म्या जागतिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करीत असून दहा विधायक कटिबद्धतेच्या आधारावर सकारात्मक दृष्टिकोन, धोरण आणि कृतीतून आपण जागतिक स्थित्यंतर घडवून आणू शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. दहशतवादाचा मुकाबला, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या किमान तीन मुद्यांवर संघटित आणि समन्वयातून कृती करीत आपण सुरक्षित जगाची निर्मिती करू शकतो. आंतरराष्टÑीय सौर आघाडीसारख्या प्रयत्नांतून आपण वातावरण बदलाविरुद्ध ठोस कृती करीत हिरव्या जगाची निर्मिती करू शकतो. सर्वसमावेशक, डिजिटल, कौशल्यपूर्ण, आरोग्यदृष्ट्या सुदृढ, सर्वसमान जगाची निर्मिती हे कटिबद्धतेचे अन्य मुद्दे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.भारत- इजिप्त संबंध बळकट करणारशियामेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष फत्ताह-एल- सिसी यांनी मंगळवारी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर चर्चेत भर दिला. मोदींचे नवव्या ब्रिक्स परिषदेसाठी ३ सप्टेंबर रोजी शियामेन येथे आगमन झाले होते. चीनभेटीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी त्यांनी सिसी यांच्याशी चर्चा केली. इजिप्तशी भारताचे ऐतिहासिक संबंध असून आम्ही ते आणखी बळकट करण्यासाठी चर्चा केली आहे, असे टिष्ट्वट मोदींनी सिसी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जारी केले. ब्रिक्स उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांचा संवाद या चर्चासत्रात इजिप्तने पाहुणा देश म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
दहशतवादाविरुद्ध ब्रिक्सकडून संघटित कृती करण्याची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:55 AM