बहरीन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी बहरीन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. बहरीन येथे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजनच्या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी देशातील विविध समस्यांची माहिती उपस्थितांसमोर ठेवली. तसेच देशाच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आवाहन केले, राहुल गांधी म्हणाले, " तुमची तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे. तुम्ही जिथे गेलात तिथे त्या त्या देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानामधून तुम्ही आपली क्षमता दाखवून दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी देशातील बेरोजगारीसह इतर समस्यांची जाणीवही उपस्थितांना करून दिली." देशातील रोजगार निर्मिती गेल्या आठ वर्षांतील निचांकी पातळीवर आली आहे. सध्या देशात गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती आणि जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा समाजात घृणा निर्माण करून फूट पाडण्याचे काम सुरू आहे." असे राहुल गांधी म्हणाले.