बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. मुझफ्फरपूर येथील एका शाळेत झाड पडल्याने मुलगा जखमी झाला होता. जखमी झालेल्या मुलाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी चुकून मुलाच्या पायात सुई सोडली होती. यानंतर मुलाच्या पायाचं दुखणं वाढू लागलं आणि हळूहळू त्याचा पाय सडण्याच्या अवस्थेत पोहोचला. कुटुंबीयांनी तातडीने मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नोव्हेंबर महिन्यात मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत पिंपळाचं झाड पडल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. जखमी मुलांना तातडीने SKMCH मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी मोहम्मद शाहनवाज या जखमी मुलाचं ड्रेसिंग करताना मुलाच्या पायामध्ये सुई तशीच राहिली आणि त्यावर प्लास्टर करण्यात आले, त्यामुळे मुलाची प्रकृती खूपच खालावली. मुलाच्या वेदना वाढल्यावर कुटुंबीयांनी त्याला पाटणा येथील पीएमसीएचमध्ये नेले.
कुटुंबीयांनी मुलाला मुझफ्फरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, जेथे एक्स-रे दरम्यान मुलाच्या पायात सुई आढळून आली. यानंतर तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि कसातरी मुलाचा पाय कापण्यापासून वाचवला आणि योग्य वेळी मुलावर उपचार करणं शक्य झालं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सिव्हिल सर्जन डॉ. ज्ञान शंकर यांनी हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आल्याचं सांगितलं. मुलाच्या ऑपरेशन दरम्यान, मुलाच्या पायाला प्लास्टर करताना, सुई पायात राहिली होती. मात्र, अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल. हे प्रकरण एसकेएचसीएच मेडिकल कॉलेजशी संबंधित आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाईल.