Wrestlers Protest : आज नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान, संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कुस्तीपटूंना ताब्यात घेतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता भालाफेकपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने या संपूर्ण घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिग्गज कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. आज हे पैलवान नवीन संसद भवनाकडे मोर्चा घेऊन निघणार होते, त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. कुस्तीपटूंना अटक करण्यासोबतच दिल्ली पोलिसांनी त्यांचे तंबूही हटवले.
यावर भालाफेकपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संपूर्ण घटनेवर शोक व्यक्त केला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकचा व्हिडिओ रिशेअर करत नीरज चोप्राने लिहिले, 'या व्हिडिओने मी दुःखी झालोय. याला सामोरे जाण्याचा आणखी चांगला मार्ग असायला हवा होता.' दरम्यान, या घटनेवरुन काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला जातोय.