नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरुद्ध रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सीबीआय इंटरपोलकडे धाव घेऊ शकते. एजन्सीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.बँकेने या दोघांवर फसवणुकीचे आरोप लावलेले आहेत. तक्रार सीबीआयकडे देण्यापूर्वीच नीरव हा पत्नी एमी, भाऊ निशाल गीतांजली समूहाचे प्रवर्तक चोकसी यांच्यासोबत देशातून फरार झाला होता. सूत्रांनी सांगितले की, एजन्सीने अलीकडेच या घोटाळ््याबाबत या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले. सुनावणीसाठी त्यांना पुन्हा देशात आणता यावे, यासाठी रेडकॉर्नर नोटीससाठी इंटरपोलकडे धाव घेण्यात येणार आहे.बँकेने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे एजन्सीने नीरवविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सूत्रांनी सांगितले की, रेडकॉर्नर नोटीसमुळे इंटरपोलच्या सदस्य देशांच्या एजन्सींना आरोपींचा पत्ता लावणे व संबंधित देशात त्यांना अटक करण्याची परवानगी मिळेल. सीबीआयने मागील आठवड्यात दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, नीरव मोदीने आपल्या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक केली. मुंबईतील पीएनबीच्या ब्रँडी हाउस शाखेतून जारी बनावट लेटर्स आॅफ अंडरटेकिंगचा (एलओयू) उपयोग करुन ६,४९८ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर चोकसीने ७०८० कोटी रुपयांची फसवणूक केली.तपशील देण्यास नकारनवी दिल्ली : ज्या आॅडिट आणि तपासणीतून १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती समोर आली. त्या आॅडिटचा तपशील देण्यास पीएनबी बँकेने नकार दिला आहे.माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पीएनबीने घोटाळ्याच्या तपास अहवालाच्या प्रती देण्यास नकार दिला आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती मागविली होती. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत.
नीरव, चोकसीविरोधात इंटरपोलकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:10 AM