लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वादग्रस्त राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदवी (नीट-यूजी) २०२४ची प्रस्तावित समुपदेशन प्रक्रिया ६ जुलैपासून पुढे ढकलण्यास नकार दिला. ही प्रक्रिया निव्वळ सुरू करणे आणि बंद करण्याची नाही, असेही न्यायालयाने खडसावले. दरम्यान, ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ उमेदवारांसाठी येत्या रविवारी सात केंद्रांवर फेरपरीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
५ मे रोजी झालेल्या परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे नीट-यूजी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए), केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भाटी यांच्या सुटीतील खंडपीठाने परीक्षेत अफरातफरीचा आरोप करणाऱ्या इतर प्रलंबित याचिकांसह या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैला ठेवली आहे.
याचिकाकर्त्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी खंडपीठाला विनंती केली की, समुपदेशन प्रक्रिया दोन दिवसांसाठी थांबवली जाऊ शकते. कारण सर्वोच्च न्यायालय ८ जुलै रोजी या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. मी समुपदेशनावर स्थगिती देण्याची विनंती करत नाही. मी फक्त प्रार्थना करत आहे.
खंडपीठाने म्हटले की, “आम्ही अशाच प्रकारची विधाने ऐकत आहोत. समुपदेशन ‘सुरू करणे आणि बंद करणे’ असा प्रकार नाही. ती एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू होत आहे. समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यास नकार देत खंडपीठाने सांगितले की, एनटीए, केंद्र आणि इतर प्रतिवादींसाठी उपस्थित असलेले वकील दोन आठवड्यांत याचिकेवर त्यांचे उत्तर दाखल करू शकतात’’.