नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:58 AM2024-07-02T06:58:55+5:302024-07-02T06:59:27+5:30

नीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे.

NEET exam is only for the rich, 70 times paper cracked in 7 years; Rahul Gandhi allegation on NDA Government | नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी नीट-यूजी परीक्षेवरून केंद्र सरकारला घेरले. सरकारने नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा बनविले असून, सरकार पेपरफुटी थांबवू शकलेले नाही. गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही दोन हजार पूर्वीच्या गोष्टी करता, मात्र आता आपण थोडी भारताच्या भविष्याबद्दलही चर्चा करायला हवी. तुम्ही रोजगार याअगोदरच संपविले असून, नोटबंदी आणि जीएसटीने लहान उद्योजक संपले आहेत. तरुणांना सैन्यात नोकरी मिळत होती, मात्र आता अग्निवीर योजना आणली गेली आहे. त्यामुळे नोकरीचा तो मार्गही तरुणांसाठी बंद झाला आहे.

नीट परीक्षा ही आता फॅशन
नीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे. नीट परीक्षेत एखादा विद्यार्थी टॉपर असू शकतो, मात्र जर त्याच्याकडे पैसे नसतील तर तो वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. नीट परीक्षा ही केवळ श्रीमंतांच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. कोटामध्ये व्यावसायिक क्लासेस सुरू करून या परीक्षेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे. तेथे हजारो, कोट्यवधी रुपये तयार केले जात आहेत, असे राहुल म्हणाले.

...तर आम्ही सरकारसोबत राहू
आजच्या काळात व्यावसायिक शिक्षण इतके महाग झाले आहे की गरीब कुटुंबातील मुलगा त्यात शिकू शकत नाही. विद्यार्थी ६ महिने, वर्षभर नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही. नीट परीक्षेवर मार्ग काढण्यासाठी पूर्ण एक दिवस चर्चा व्हावी. आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत राहू. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे हे मोठे अपयश आहे. त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र सरकारला यावर  कोणतीही चर्चा करायची नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

देशामध्ये विविध परीक्षा होत असतात. या परीक्षांबाबत विशेषत: नीट-यूजी, नीट-पीजीबद्दल अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींवर तातडीने योग्य तोडगा काढणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये परीक्षांत घडलेले गैरप्रकार, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीतील भ्रष्टाचार या गोष्टी अतिशय गंभीर व चिंता वाटण्याजोग्या आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता, चिंता आणि संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे व अन्य गैरप्रकार समोर आल्यामुळे नीट-यूजी परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी अनेक जणांनी केली आहे.- मायावती, प्रमुख, बसप

Web Title: NEET exam is only for the rich, 70 times paper cracked in 7 years; Rahul Gandhi allegation on NDA Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.