एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : ‘नीट-यूजी २०२४’ पेपरफुटीवरून देशभरात गदारोळ सुरू असताना या प्रकरणातील येथील आरोपींनी कबुली दिली असून, पेपर फुटल्याचे म्हटले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीने परीक्षेच्या एक दिवस आधीच परीक्षार्थ्यांकडून प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी करून घेतली होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. पेपरफुटीच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून ३० ते ३२ लाख रुपये घेण्यात आले.
अटकेतील एक परीक्षार्थी अनुराग यादव यानेही परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याची कबुली दिली. ‘माझ्या काकांनी प्रश्नपत्रिकेची व्यवस्था केली. त्यानंतर आपल्याला कोटा येथे बोलावण्यात आले. मला परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची घोकंपट्टी करायला लावली. दुसऱ्या दिवशी परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तिच प्रश्नपत्रिका मिळाली, परंतु परीक्षा संपल्यानंतर पोलिस आले आणि मला पकडले,’ असे त्याने कबुली जबाबात म्हटले आहे.
कनिष्ठ अभियंता सिकंदर यादवेंदू मास्टरमाइंड‘ईओयू’चे म्हणणे आहे की, नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड सिकंदर कुमार यादवेंदू नावाचा कनिष्ठ अभियंता आहे. त्याचा संबंध थेट बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्याशी जोडला जात आहे.
ईओयू तेजस्वी यादव यांचे उपसचिव प्रीतम कुमार यांना पेपरफुटीप्रकरणी चौकशीसाठी बोलावणार आहे. पेपर फुटल्यांतर सिकंदर यादवेंदू याच्यासाठी सरकारी अतिथीगृह बुक करण्यापासून ते त्याची नेमणूक (पोस्टिंग) करण्यापर्यंत प्रीतम कुमार यांचा हात असल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे ईओयू त्यांना बोलावून चौकशी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या मुद्द्यावर ईओयूचा कोणताही अधिकारी अधिकृतपणे काहीही बोलायला तयार नाही.
पेपरफुटीत तेजस्वींचे खासगी सचिव?नीट प्रकरणात काही आरोपींना सरकारी पाहुणचाराची व्यवस्था करण्यात आली होती. पाटणा येथील ‘न्हाई’ गेस्ट हाउस प्रकरणात तथ्य लपविल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तेजस्वी यादव यांचे खासगी सचिव प्रीतम यादव यांनीच पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सिकंदर यादवेंदूसाठी पाटणा येथे अतिथीगृह बुक केले होते, असा दावा नीट बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी गुरुवारी केला.
भौतिकशास्त्रात ८५, रसायनशास्त्रात ५ गुण
- कथित पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी अनुराग यादवला भौतिकशास्त्रात ८५.८ टक्के, तर रसायनशास्त्रात ५ टक्के गुण मिळाले आहेत.
- गुणपत्रिकेनुसार त्याने ७२० पैकी १८५ गुण मिळवले आहेत.