लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट परीक्षेबाबतच्या वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतचा आपला सूर बदलला आहे. यातील दोषींना सोडणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी आश्वासन दिले की, जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
ओडिशामधील आपल्या मतदारसंघात प्रधान म्हणाले की, काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमुळे ग्रेस मार्क दिले गेल्याचे आढळले आहे तर दुसरीकडे दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून, विद्यार्थी आणि पालकांनी निश्चिंत राहावे. आम्ही कडक कारवाई करणार आहोत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधील अधिकारीही या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही दोषींनी सोडले जाणार नाही.
न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत वाद सुरू असताना या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करा अशी मागणी माजी मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केली. तसेच, सरकारने परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतींबाबत सर्व राज्यांशी सखोल चर्चा करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अधिवेशनात जोरदारपणे मुद्दा मांडावा : सिब्बल
आगामी संसदेच्या अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत सरकार चर्चेला परवानगी देणार नाही. त्यामुळे त्यावर चर्चा होण्याची फारशी आशा नाही. गुजरातमधील काही घटनांनी मला धक्का बसला आहे, असे सिब्बल म्हणाले.
गुणवत्तेचे मोजमाप म्हणून सादर केली जाणारी नीट परीक्षा एक घोटाळा आहे. केंद्र सरकारने या परीक्षेची बाजू घेऊ नये. कारण ते विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात, सामाजिक न्याय आणि गरिबांच्या विरोधात आहे.- एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ची सत्यनिष्ठा आणि नीट परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न आहे. नीटमध्ये भेदभाव होतो आहे का? गरीब विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित ठेवले जात आहे का? महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांनीही नीटबाबत शंका व्यक्त केली आहे.- जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस