तिरुवनंतपुरम - NEET च्या परीक्षेदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेपूर्वी तपासणीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्सही उतरवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात NEET परीक्षेदरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, मार्थोमा संस्थेने हे वृत्त फेटाळले आहे. मात्र विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलिसांकेड तक्रार केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे कोटा येथील मोदी कॉलेज सेंटरमध्ये चार मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून आल्याने पोलिसांनी गेटवरच थांबवले. विद्यार्थिनींनी हिजाब हटवण्यास नकार दिला. त्यांचे कुटुंबीयही अडून बसले. अखेर त्यांच्या परीक्षेबाबत जो निर्णय घेतला जाईल, त्याच्यासाठी त्या स्वत:जबाबदार असतील असं त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले.
परीक्षेतील नियमांनुसार विद्यार्थी पूर्ण बाह्या असलेले कपडेही पेपर देताना घालू शकत नाहीत. जर कुणी असे कपडे घालून आल्यास बाह्या कापल्यानंतरच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना इतर कुठलंही साहित्यही नेता येत नाही.