नीट, नेटच्या परीक्षा पेपर फुटल्यामुळे वादात सापडलेल्या असताना उद्या होणारी मेडिकल प्रवेशाची नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या, २३ जूनला होणारी नीट पीजी परीक्षा ११ तास शिल्लक असताना पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस जारी करून याची माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी परीक्षार्थी nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर भेट देऊ शकतात. ही परीक्षा 23 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता होणार होती. आधीच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतू नीट पीजी परीक्षा रद्द करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.
दरम्यान, एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटविण्यात आले आहे. प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवे संचालक असणार आहेत. खरोला हे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी होते. आता एनटीएची गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळविण्याचे काम खरोला यांना करावे लागणार आहे.