लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदाच्या वर्षीची नीट-पीजी परीक्षा पुुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका काही डॉक्टरांनी दाखल केली होती. मात्र असा निर्णय घेतल्यास डॉक्टरांचा तुटवडा भासून त्याचा रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता ही परीक्षा आता २१ मे रोजीच होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलल्यास गोंधळ व अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दोन गट आहेत. एका गटाला या परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे वाटते. मात्र अनेकांना या परीक्षा वेळेवर व्हायला हव्या आहेत. दोन लाख सहा हजाराहून अधिक डॉक्टर यंदाची नीट-पीजी परीक्षा देणार आहेत.
एकाच कालावधीत दोन परीक्षा घेण्यास विरोधn सध्या नीट-पीजी २०२१ ही परीक्षा सुरू असून, त्याचदरम्यान २१ मे रोजी यंदाच्या वर्षीची नीट-पीजी परीक्षा घेतल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. n त्यामुळे यंदाची नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारी याचिका काही डॉक्टरांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली होती.