लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये सीबीआयने आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामध्ये एका परीक्षार्थीचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत जेरबंद केलेल्या आरोपींची संख्या ११वर पोहोचली आहे. ही माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. या प्रकरणात सीबीआयने प्रथमच एका परीक्षार्थीला अटक केली.
नालंदा येथील परीक्षार्थी सन्नी, आणखी एका परीक्षार्थीचे वडील रणजितकुमार यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. या परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल सीबीआयने आतापर्यंत सहा एफआयआर दाखल केले आहेत. नीट-यूजी परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती. देशभरातील ५७१ शहरांतील ४७५० केंद्रांमध्ये तर विदेशात १४ केंद्रांमध्ये झालेल्या या परीक्षेला २४ लाख विद्यार्थी बसले होते.
गंगाधरला दोन दिवस सीबीआय कोठडी
लातूर: 'नीट' गुणवाढीसंदर्भात दाखल गुन्ह्यात सीबीआय पथकाने आंध्र प्रदेशातून दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या गंगाधरला बंगळुरू येथून सोमवारी रात्री उशिरा लातुरात आणले. त्याला मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. लातुरातील दोन शिक्षक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी रात्री उशिरा अटक केलेल्या गंगाधरसोबत 'त्या' दोघा शिक्षकांचा १६ लाखांचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे.