NEET परीक्षेचे पेपर फुटल्याने देशातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. तसेच शिक्षण क्षेत्रापासून ते संसदेपर्यंत सर्वत्र याचे पडसाद उमटले होते, दरम्यान, नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, नीट परीक्षेबाबतचा निर्णय देताना सरन्यायाधीशांनी पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश न देण्यामागचं कारणही निकालपत्रामधून स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीशांनी सांगितलं की, ज्या लोकांनी नीट परीक्षेमधील गडबडीचा फायदा उचलला आहे, त्यांची ओळख पटवणं शक्य आहे. तसेच पुढे जाऊन काही गडबड दिसून आल्यास त्यांचा प्रवेश रद्द करता येईल.
सरन्यायाधीशांनी पुढे सांगितलं की, या वर्षासाठी नव्याने नीट यूजी परीक्षा घेण्याचे आदेश देण्याच्या निर्णयाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं कोर्टाला वाटतं. तसेच त्याचा फटका ही परीक्षा देणाऱ्या २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना बसू शकतो. तसेच त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा येईल. त्याशिवाय वैद्यकीय अभ्यासाच्या अभ्यासक्रमावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच आरक्षण देण्यात आललेल्या वंचित समुहातील विद्यार्थ्यांनाही यामुळे नुकसान होऊ शकतं.
नीट यूजी परीक्षेचं आयोजन ५७१ शहरांमधील ४ हजार ७५० केंद्रांवर करण्यात आलं होतं. त्याशिवाय परदेशातील १४ शहरांमध्येही ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नीट परीक्षेचे पेपर फुटले होते. तसेच परीक्षेच्या संचालनामध्ये काही त्रुटी राहून गेल्याचे सांगत पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. दरम्यान, याबाबत सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. तसेच याबाबत आज निर्णय दिला.