लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेची विश्वासार्हता भंग करण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे आम्ही यंदा ५ मे रोजी झालेली ही परीक्षा रद्द केली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा वादग्रस्त ठरली होती.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात २३ जुलै रोजी निकाल दिला होता. त्यात त्यांनी ही परीक्षा रद्द का केली नाही, त्या कारणांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. या निकालपत्रात म्हटले आहे की, नीट-यूजी परीक्षा घेणाऱ्या यंदा पाटणा व हजारीबाग या दोन ठिकाणीच नीट-यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आढळले. अन्य ठिकाणी अशा घटना घडल्या नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही ही परीक्षा रद्द केली नाही.
‘लाखो विद्यार्थ्यांना त्रास झाला असता’
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-यूजी परीक्षेला यंदा २३ लाख विद्यार्थी बसले होते. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी तसेच परीक्षेच्या विश्वासार्हतेला धक्का लावण्याकरिता व्यापक स्तरावर पद्धतशीर प्रयत्न झाले नव्हते असे आढळून आले आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले.