NEET-UG Paper Leak : NEET पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बिहारमध्ये मोठी कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी (18 जुलै) पाटणा AIIMS मध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना/डॉक्टरांना अटक केली. सीबीआयने चौघांना सकाळीच ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. आरोपींपैकी तिघे एमबीबीएस तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी असून, एक विद्यार्थी द्वितीय वर्षाचा आहे. चंदन सिंह (तृतीय वर्ष), राहुल आनंद (तृतीय वर्ष), करण जैन (तृतीय वर्ष) आणि कुमार सानू (द्वितीय वर्ष) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी एम्स पटनाचे संचालक जीके पॉल म्हणाले, 'आमच्यासाठी ही बाब खुप लाजिरवाणी आणि धक्कादायक आहे. आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहणार आहोत. हे विद्यार्थी सहभागी झाले असतील, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.'
सीबीआयने काल दोन आरोपींना अटक केलीसीबीआयच्या सांगितल्यानुसार, एम्सच्या वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या वसतिगृहातील खोल्याही सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सीबीआयने दोन दिवस आधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरचा 2017 बॅचचा सिव्हिल इंजिनियर पंकज कुमार उर्फ आदित्य याला अटक केली होती. हजारीबागमधील नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या ट्रंकमधून NEET-UG प्रश्नपत्रिका चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सीबीआयने राजू सिंग नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. त्याच्यावर प्रश्नपत्रिका चोरण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
सीबीआयने आतापर्यंत 6 एफआयआर नोंदवल्या NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आतापर्यंत 40 गुन्हे दाखल केले आहेत. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेली एफआयआर ही प्रश्नपत्रिका फुटण्याशी संबंधित आहे, तर गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेली उर्वरित प्रकरणे फसवणूक आणि उमेदवारांच्या जागी दुसऱ्याने परीक्षा देण्याशी संबंधित आहेत.