सर्वोच्च न्यायालयाने NEET UG परीक्षेबाबत आपला निकाल दिल्यानंतर आज एनटीएने या परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजीचा सुधारित निकाल दोन दिवसांच्या आत जाहीर केला जाईल, असे सांगतिले होते. त्यानुसार आज हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. NEETची परीक्षा दिलेले विद्यार्थी exams.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
मागच्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेल्या फिजिक्सच्या प्रश्नांची आयआयटी दिल्लीकडून तपासणी करून घेण्याचे आदेश एनटीएला दिले होते. तसेच निकाल पुन्हा जाहीर करण्याचीही सूचना दिली होती. दरम्यान, नीटची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही पेपरफुटी व्यापक प्रमाणावर झालेली नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देणे योग्य ठरणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
दरम्यान, सुधारिर अंतिम निकालामध्ये ४ लाखांहून अधिक परीक्षार्थिंची क्रमवारी बदलली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ग्रेस मार्क दिले गेलेल्या नीट यूजी २०२४ च्या परीक्षेतील ४४ अव्वल विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. नीट यूजी परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मेडिकल कौन्सिलिंग कमिटी आणि राज्य कौन्सिलिंग मंडळ यूजी मेडिकल प्रवेशांसाठी ऑनलाइन कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू करेल.