नवी दिल्ली - गुन्हेगाराने कितीही गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यात तो सापडतोच. मात्र दिल्लीमध्ये प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी कायद्याचे हात कमी पडल्याचं दिसून आलं. आरोपीच्या मृत्यूपर्यंत तो पोलिसांपासून वाचून राहिला. या हत्येतील आरोपी आपली ओळख बदलून राजधानीजवळील गुडगावमध्ये जॉब करत होता. पोलिसांनी 8 वर्षानंतर त्याचा मृतदेह मिळाला. 11 फेब्रुवारी 2011 मध्ये राजूने नीतूची हत्या केली. तिचा मृतदेह एका बॅगेत भरुन दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झाला.
आरोपी राजूने हत्या केल्यानंतर रोहन दहिया नावने गुडगावमध्ये वास्तव्य करु लागला. तेथील स्थानिक कंपनीत तो जॉब करत होता. पोलिसांनी राजूच्या कुटुंबांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्याला ओळखण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्याचा काका रणसिंह गहलोत यांनी ओळख पटवून दिली.
राजू गहलोत आणि नीतू सोलंकी हे 2010 मध्ये एकत्र आले. दोघांच्या लग्नाला घरातून विरोध होत असल्याने एकमेकांपासून दूर जाऊ ही भीती कायम त्यांच्या मनात होती. कायद्याची पदवी घेतल्यानंतर नीतूने मार्च 2010 मध्ये नातेवाईकांना सिंगापूरमध्ये जॉब लागल्याचा बहाणा करुन गायब झाली. राजूने एप्रिल 2010 मध्ये एअर इंडियाचा जॉब सोडला. तेव्हापासून हे दोघे मुंबई, गोवा आणि बंगळुरु याठिकाणी वास्तव्य करत होते.
8 वर्ष गुन्हे शाखेकडून नीतूच्या हत्येचा आरोप असलेला आरोपी राजूला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 25 जून रोजी त्याचा शोध पोलिसांना लागला. त्यावेळी आरोपी राजू गुडगावमधील हॉस्पिटलमध्ये लीवरच्या आजारावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2011 रोजी दिल्ली स्टेशनवर मिळालेल्या बॅगेत मुलीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाच्या कमरेला मोर पंखाचा टॅटू बनविला होता. या टॅटूच्या आधारावर मुलीची 15 दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर खूप शोधलं तरीही पोलिसांना राजू सापडला नाही. राजू आणि नीतूमध्ये पैशांच्या कारणावरुन वाद सुरु होते. या वादातूनच राजूने नीतूची हत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार काम सोडल्यानंतर राजू चोरी आणि ब्लॅकमेलिंगसारखे गुन्हे करु लागला. त्यामुळे नीतू राजूवर नाराज होती. त्यावरुन राजू आणि नीतूमध्ये वारंवार भांडण होत असे. याच भांडणांचे रुपांतर हत्येत झालं.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत राजू गहलोतचा समावेश होता. अनेकदा राजूला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेने त्याचा पाठलाग केला. मात्र नेहमीच तो चकमा देऊन पळून गेला. राजू गोव्याला असलेली माहिती मिळाल्यानंतर दोन-तीन महिने गोव्यात पोलीस त्याचा शोध घेत होती. एकदा मुंबईतील कल्याण येथून राजूचा त्याचा भावाला फोन आला त्यावेळीही आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस मुंबईला आली. मात्र तेथूनही राजू फरार झाला होता. वारंवार ठिकाणं बदलल्यामुळे राजूचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं मात्र 25 जून 2019 रोजी गुडगावच्या हॉस्पिटलमधून राजूच्या घरी कॉल आला तेव्हा त्याच्या कुटुंबातून एकाने पोलिसांना माहिती दिली. पण जेव्हा पोलीस राजूला पकडण्यासाठी हॉस्पिटलला पोहचली त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.