नवी दिल्ली : गोएअरच्या वैमानिकाचा निष्काळजीपणा जवळपास दीडवर्षाने समोर आला आहे. दिल्लीवरूनमुंबईला येणाऱ्या विमानाच्या एका इंजिनावर उड्डाणावेळी पक्षी आदळला होता. बिघाड झालेले ते इंजिन पायलटने बंद करण्याऐवजी सुस्थितीत असलेले इंजिन बंद केले. धक्कादायक म्हणजे ही बाब या वैमानिकाला 3300 फुटांवर हवेत गेल्यानंतर लक्षात आली होती. विमानात तेव्हा 156 प्रवासी होते. हे विमान एकाच इंजिनावर पुन्हा दिल्ली विमानतळावर आणण्यात आले.
डीजीसीएने या घटनेचा अहवाल मागविला होता. ही घटना 21 जून 2017 मधील आहे. या दिवशी गो एअरचे ए320 विमान सकाळी 5.58 वाजता दिल्लीहून निघाले होते. उड्डाणावेळी विमानाच्या दोन नंबरच्या इंजिनाला पक्षी आदळला होता. उड्डाणावेळी वेगळा आवाज आला होता, तरीही या पायलटने विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला, कारण विमान हवेत उडाल्यानंतर बिघाडाबाबत त्याला जाणून घ्यायचे होते.
मात्र, हवेत गेल्यानंतर वैमानिकाने चुकीचे अनुमान काढले आणि इंजिन 2 जे खराब होते ते बंद न करता इंजिन 1 बंद केले. या बिघडलेल्या इंजिनावर विमान 3 मिनिटे उडत होते. 3300 फुटांवर गेल्यावर विमानाने उंचीवर जाणे बंद केले. यावेळी पायलटना त्यांची चूक समजली. त्यांनी चुकीचे इंजिन बंद केले होते. यानंतर त्यांनी इंजिन 1 सुरु करण्याचा प्रयत्न केला, मात्र पहिल्या वेळी त्यांना अपयश आले.
दुसऱ्यांदा केलेल्या प्रयत्नात इंजिन सुरु झाले. यानंतर पायलटनी दिल्लीच्या विमानतळावर विमान उतरविले. तपासणीवेळी नंबर 2 च्या इंजिनामध्ये रक्ताचे डाग दिसले. इंजिनाच्या पंख्याचे दोन पाती खराब झाली होती.