नवी दिल्ली : तत्कालीन नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरीच केली नव्हती, तर ही माहिती ‘एम15’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेलाही पुरवली होती. अलीकडे गुप्त सूचीतून गाळण्यात आलेल्या गुप्तहेर खात्याच्या दस्तऐवजांवरून ही माहिती उघड झाली आहे.नेताजींचे निकटस्थ एसी नांबियार आणि त्यांचा पुतण्या अमिया नाथ बोस यांच्यातील एक पत्र भारतीय गुप्तहेर खात्याने ‘एम15’ ला पुरवले होते. ६ आॅक्टोबर १९४७ रोजी लिहिलेल्या या पत्राद्वारे गुप्तहेर खात्याचे अधिकारी एस.बी. शेट्टी यांनी ‘एका पत्राचा’ हवाला देत, ‘एम15’ चे अधिकारी के.एम. बोर्न (दिल्लीत पदस्थ) यांना सल्ला मागितला होता. शेट्टी यांनी या पत्रात ज्या पत्राचा हवाला दिला होता, ते पत्र नांबियार यांनी अमिया बोस यांना १९ आॅगस्ट १९४७ रोजी लिहिले होते. शेट्टींना हे पत्र मिळाल्यानंतर बोर्न यांनी दुसऱ्याच दिवशी ते अधिक माहितीसाठी ‘एम15’ च्या डायरेक्टर जनरलकडे पाठवले होते.भारत स्वतंत्र झाल्याच्या काही महिन्यानंतर लिहिलेली ही दोन्ही पत्रे ‘एम15’ च्या गुप्त सूचीतून हटविण्यात आलेल्या आणि गतवर्षी सार्वजनिक झालेल्या फाईल्सचा भाग आहेत. नेताजींवर १५ वर्षांपर्यंत संशोधन करणारे लेखक अनुज धर या फाईल्सपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. नेमक्या कुठल्या कारणाने ही हेरगिरी केली हे स्पष्ट झाले नसले तरी नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस व अमेयनाथ यांच्यावर आयबीचे जास्त लक्ष होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
नेहरू सरकारने ‘एम 15’ला दिली होती ‘ती’ माहिती
By admin | Published: April 13, 2015 4:19 AM