यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:31 AM2019-03-28T05:31:30+5:302019-03-28T05:32:04+5:30

उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.

Nehru, Indira Gandhi's contribution also contributed; Congress blames Narendra Modi | यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

Next

नवी दिल्ली : उपग्रहनाशक क्षेपणास्त्र (एसॅट) विकसित केलेल्या देशांत भारताचा समावेश झाल्याबद्दल इस्रो व केंद्र सरकारचे काँग्रेसने अभिनंदन केले आहे. मात्र, या प्रगतीमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनी बजावलेल्या कामगिरीचाही मोलाचा वाटा आहे, याचीही काँग्रेसने आठवण करून दिली आहे.
उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने मिळविलेल्या यशाचे सर्वात जास्त श्रेय कोणत्याही सरकारपेक्षा इस्रोच्या शास्त्रज्ञांना देणे काँग्रेसने पसंत केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, देशात अवकाश संशोधन कार्यक्रमाची सुरुवात १९६१ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. स्व. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत इस्रोने संशोधनात मोठी भरारी घेतली होती. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत हाती घेण्यात आला. आज तो यशस्वी ठरला आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.
उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र विकसित केल्याबद्दल डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेन्ट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ)चे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे. मात्र या क्षेपणास्त्राची चाचणी मिशन शक्ति मोहिमेद्वारे यशस्वी झाल्यानंतर त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या थाटात दूरदर्शनवर घोषणा केली त्या अविष्काराची ‘जागतिक नाट्यदिनानिमित्त अभिनंदन' असा उल्लेख करून राहुल गांधी यांनी खिल्ली उडविली आहे.

मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न : अखिलेश यादव
देशातील मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तिच्या यशानिमित्त दूरचित्रवाहिनीवरून एक तास केलेल्या भाषणातून केले असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. बेरोजगारी, ग्रामीण भागातील दुरवस्था, महिलांची सुरक्षितता या गंभीर प्रश्नांबद्दल मोदींनी मौन पाळले असेही ते म्हणाले.

मिशन शक्ती यशाचा मोदींकडून राजकारणासाठी वापर : मायावती
उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र विकसित केल्याच्या यशाचा नरेंद्र मोदी राजकारणासाठी व लोकसभा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. मोदींच्या या कृतीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Nehru, Indira Gandhi's contribution also contributed; Congress blames Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.