ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या विषयीची माहिती देणा-या दिल्लीतील ख्यातनाम नेहरु म्यूझियममध्ये आता फक्त नेहरु दिसणार नाहीत. या म्यूझियममध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतली असून या निर्णयावरुन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील ख्यातनाम नेहरु म्यूझियममध्ये जवाहरलाल नेहरु यांच्या वस्तू, त्यांच्याशी संबंधीत साहित्य व माहिती उपलब्ध होती. आता मोदी सरकारने या म्यूझियमचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या म्यूझियममध्ये नेहरुंसोबतच भारताच्या प्रगतीचा लेखाजोखाच मांडला जाणार आहे. भारतीय लोकशाहीचा विकास, भारताची मंगळ झेप, स्मार्ट सिटी प्रकल्प याविषयीची माहितीही म्यूझियममध्ये दिली जाणार आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून तज्ज्ञांकडून मतंही मागवली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. पण मोदी सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा व संघनेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, पण त्यांना इतिहासच बदलायचा आहे, म्यूझियमची मुलभूत ओळख पुसणे अयोग्य आहे असे मत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मांडले आहे. तर नवीन पिढीला विशेषतः लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी हा कायापालट करणे गरजेचे आहे असे म्यूझियमच्या अधिका-यांनी सांगितले.