नवी दिल्ली: सध्या देशभरात 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जात आहे. पण, या मोहिमेच्या जाहिरातीवरुन कर्नाटक सरकार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे कर्नाटक सरकारने पंतप्रधान मोदींच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत देशाच्या स्वातंत्र्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो लावण्यात आले. विशेष म्हणजे जाहिरातीत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना स्थान न देता विनायक सावरकर यांना स्थान देण्यात आले आहे. ही जाहिरात आज(14 ऑगस्ट) प्रसिद्ध झाली आहे. राज्य सरकारच्या या जाहिरातीवर आता कर्नाटक काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
दुसरीकडे, भारताच्या दुसऱ्या 'फाळणी मेमोरियल डे' निमित्त भाजपने काँग्रेस पक्षावर निशाणा साधत एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये भाजपने 1947 च्या घटनांच्या घटनांचा उल्लेख केला. सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरण्यात आले आहे. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्माण करण्याच्या मागणीला बळी पडल्याचा ठपका नेहरूंवर ठेवण्यात आला आहे.
मोदींची जीनांशी तुलनाया व्हिडिओवरून काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, '14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन म्हणून साजरा करण्यामागे पंतप्रधानांचा वेगळाच हेतू आहे. ते आपल्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा वापर करत आहेत. देशाचे विभाजन करण्यासाठी आधुनिक काळातील सावरकर आणि जीनांचे प्रयत्न आजही सुरू आहेत,' अशी टीका त्यांनी केली.
फाळणी दिवस1947 मधील फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या कष्टांची आणि बलिदानाची देशाला आठवण करून देण्यासाठी गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी स्मृती दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्विट केले आहे.