...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 08:48 AM2018-02-14T08:48:24+5:302018-02-14T09:26:46+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. यातच आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलेल्या नवीन दाव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.    

nehru sought rss help in jammu and kashmir when pakistan attacked after independence uma bharti | ...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

googlenewsNext

भोपाळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. यातच आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलेल्या नवीन दाव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.    
''देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही दिवसांनंतर पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानविरोधात आरएसएसकडे मदतीची मागणी केली होती'', असा दावा उमा भारती यांनी केला आहे.  

''स्वातंत्र्यानंतर काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंह संधी यांनी करारावर हस्ताक्षर करत नव्हते. शेख अब्दुल्लांनी त्यांच्यावर हस्ताक्षर करण्यासाठी दबाव टाकला. यावेळी नेहरू द्विधा मनस्थितीत होते आणि पाकिस्तानने अचानक हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचे सैन्य उधमपूरच्या दिशेने येत होते. यावेळी नेहरूंनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्याकडे संघाच्या स्वंयसेवकांची मदत मागितली होती. त्यावेळी संघाचे स्वंयसेवक मदतीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते'', असा दावा उमा भारती यांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरू असतानाच उमा भारती यांनी हे विधान केले आहे. यामुळे आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

नेमके काय म्हणाले होते मोहन भागवत?

वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी असे विधान करुन भारतीय सैन्याचा अपमान केल्याची भावना विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. आरएसएस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे.  आरएसएसच्या विचारधारेवरुन मतभेद असू शकतात पण संघाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी स्वयंसेवकांनी केलेली मदत आपण नाकारु शकत नाही. 

या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आतापर्यंतच्या तीन युद्धांमधील योगदान आपण जाणून घेऊया. 

- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण देश स्वतंत्र होत असतानाच फाळणी झाली ती जखम आजही अनेकांच्या मनात कायम आहे. अखंड भारताचे दोन भाग झाले. जगाच्या इतिहासातील आजही ही सर्वात मोठी फाळणी म्हटली जाते. देश स्वतंत्र होताच लगेच  पाकिस्तानने काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते. पाकिस्तानी फौजा काश्मीरच्या सीमेपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यावेळी एमएस गोळवलकर आरएसएसचे सरसंघचालक होते. त्यांनी काश्मीर वाचवण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांना रक्ताच्या शेवटच्या थेबांपर्यंत संघर्ष करण्याचे आवाहन केले होते. फाळणीच्यावेळी सर्वत्र हिंसाचार, रक्तपात चालू होता. परिस्थिती हाताळणे सरकारला कठिण जात होते. त्यावेळी पाकिस्तानातून येणा-या नागरीकांसाठी आरएसएसने तीन हजार मदत छावण्या उभारल्या होत्या. 

- 1962 साली चीन बरोबर झालेल्या युद्धात आपला पराभव झाला. पण त्यावेळी आरएसएसने महत्वाचे योगदाने दिले होते. देशभरातून इशान्य भारतामध्ये एकत्र झालेल्या स्वंयसेवकांनी भारतीय सैन्यदल आणि स्थानिकांना आवश्यक सहाय्य केले होते. मदत छावण्या उभारुन जखमी सैनिकांवर उपचार केले होते. आरएसएसच्या त्या कामगिरीची दखल घेऊन दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात  सहभागी होण्यासाठी संघाला निमंत्रण दिले होते. राजकीय विचारधारेमुळे नेहरुंचा संघाला विरोध होता. पण त्यावेळी मतभेद बाजूला ठेऊन नेहरुंनी संघाला निमंत्रण दिले होते. 

-  1965 साली भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना आरएसएसने पहिल्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संघ स्वयंसेवकांनी त्यावेळी काश्मीरमधील हवाई दलाच्या धावपट्टीवर जमा झालेला बर्फ हटवण्यात आणि धावपट्टी दुरुस्त करण्यात मदत केली होती. त्यामुळेच पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी एअर फोर्सच्या विमानांना उड्डाण आणि लँडिंग करणे शक्य झाले. दिल्लीमध्ये वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी त्यावेळी संघ स्वयंसेवकांकडे होती. त्यामुळे पोलिसांना त्यावेळी डिफेंन्स डयुटीसाठी तैनात करता आले.  

- 2004 साली त्सुनामीमुळे दक्षिण भारतात मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी तसेच गुजरात भूकंप, आंध्रप्रदेश आणि उत्तराखंडमधील पुराच्यावेळीही संघ स्वयंसेवक मदतीसाठी धावून गेले होते. आतापर्यंत देशाला जेव्हा जेव्हा मोठया नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे तेव्हा तेव्हा आरएसएसने मृतदेह उचलण्यापासून ते जखमींची मदत करण्यापर्यंत तसेच गावच्या गाव पुन्हा वसण्यात  महत्वाचे योगदान दिले आहे. संघाच्या वेगवेगळया शाखा असून त्यामाध्यमातून संघ सामाजिक क्षेत्रात मोठया प्रमाणावर कार्यरत आहे. 

(संदर्भ डीएनए वर्तमानपत्र)

Web Title: nehru sought rss help in jammu and kashmir when pakistan attacked after independence uma bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.