ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुजींच्या विकीपीडियावरील पेजवर सरकारी आयपी अॅड्रेसवरुन काही बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. नेहरुजींचे आजोबा गंगाधर नेहरु हे मुस्लीम असल्याचे या पेजवर म्हटले होते. विकीपीडियावरील माहिती बदलण्याचे उद्योग सरकारी यंत्रणेने करणे यापेक्षा आणखी दुर्दैवी प्रकार काहीच नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विकीपीडियावरील जवाहरलाल नेहरु यांच्या पेजवर काही आक्षेपार्ह माहिती टाकली जात असल्याचे सायबर तज्ज्ञ प्रणेश प्रकाश यांच्या निदर्शनास आले. यात जवाहरलाल नेहरु यांचे आजोबा मुस्लिम होते, नेहरु यांचे इंग्रज अधिका-याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते असे काही आक्षेपार्ह उल्लेख यामध्ये होते. प्रणेश यांनी हे बदल कुठून झाले याचा शोध घेतला असता राष्ट्रीय माहिती विभागाच्या आयपी अॅड्रेसवरुन बदल झाल्याचे समोर आले. सरकारी कॉम्प्यूटर हॅक करुन हे बदल केले गेले असावे अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. तर याप्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.