नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणि सत्ताधारी भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येते. त्यातच, नरेंद्र मोदींकडून पंडित जवाहरलाल नेहरुंचं नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. त्यामुळे, काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर दिलं जातं. त्यातच, भाजपकडून काही शहरांची नावे बदलण्यात येत आहेत, काही ऐतिहासिक वस्तूंची नावेही बदलली जात आहेत. त्यावरुन, काँग्रेसने सत्ताधारी भाजपला अनेकदा लक्ष्य केलं आहे. तरीही, मोदी सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू यांचं शेवटपर्यंत ज्या घरात वास्तव्य होतं, त्याच्या नावातून पंडित नेहरूंचं नाव वगळलं आहे. यावरुन, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच वर्षी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच या संग्रहालयाचं नामांतर करण्यात आलं आहे. त्यावरुन, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हे नाव बदलण्याची गरज नव्हती, असे म्हटलंय. भारत देश बनवण्यात पंडित नेहरुचं मोठं योगदान आहे. स्वातंत्र्यांच्या लढाईतही त्यांचं योगदान आहे. देशात आत्तापर्यंत अनेक पंतप्रधान झाले, प्रत्येकानेच देशासाठी योगदान दिलंय. परंतु, दिल्लीतील या संग्रहालयाचं नाव बदलण्याची गरज नव्हती. पंडित नेहरुंचं नाव संग्रहालयास चालू शकलं असतं. पण, पंडित नेहरुंवरील द्वेषापोटीच हे काम करण्यात आलंय, असे संजय राऊत यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण
एनएमएमएलनं या म्युझियमला दिलेलं जवाहरलाल नेहरूंचं नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं. नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, दस्तावेज, फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आता या संग्रहालयाच्या नावातून नेहरुंचं नाव काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याऐवजी आता हे संग्रहालय ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ या नावाने ओळखलं जाईल.