ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 8- भाजपाशासित राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव वगळण्यात आलं आहे. पाठ्यपुस्तकातून नेहरूंचं नाव वगळल्यानं काँग्रेसही भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. या प्रकाराचा काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानमधल्या आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरूंचा धडा होता. नेहरूंनी बॅरिस्टर झाल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि ते देशाचे पहिले पंतप्रधान असल्याची माहिती या पाठ्यपुस्तकात होती. मात्र आता नव्या प्रसिद्ध झालेल्या पाठ्यपुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला नसून, सर्व माहिती काढून टाकण्यात आली.
राजस्थान शिक्षण बोर्डाच्या अजमेरमधल्या आठवीतल्या पाठ्यपुस्तकातील सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकातून ही माहिती वगळण्यात आली आहे. हे पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध नाही. मात्र प्रकाशकांनी ही माहिती राजस्थान पुस्तक मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या वीर सावरकर, महात्मा गांधी, भगत सिंग, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस यांच्या नावांचा उल्लेख कायम ठेवण्यात आला आहे. मात्र यातून फक्त नेहरूंचंच नाव वगळण्यात आलं आहे.
या प्रकारानंतर काँग्रेसही भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. शाळेतल्या पाठपुस्तकातून इतिहास पुरुष आणि राष्ट्र निर्मात्यांची नावं गायब करणारं सरकार एक दिवस स्वतः सत्तेतून हद्दपार होईल, मात्र इतिहास कधीच पुसला जाणार नाही, अशी घणाघाती टीका राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केली आहे.