शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़ याच अनुषंगाने जगभरातील दिग्गज आणि बिगर भाजपा व बिगर रालोआ पक्षांना काँग्रेसने सोमवारी नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात एकत्र आणले़ नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले़आपल्या भाषणात सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवरही थेट हल्ला चढवला़ अलीकडे तथ्यांचा विपर्यास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ सत्य दडवून आणि असत्याची कास धरून नेहरूंची विचारधारा डावलली जात आहे; पण नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ भारताला स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ मानवी स्वातंत्र्य आहे, हा नेहरूंचा विचार होता़ त्यांच्या याच विचारधारेने नेल्सन मंडेला आणि आँग सान सू की यांनाही प्रेरित केले, असे सोनिया म्हणाल्या़भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा संसदीय लोकशाहीवर अतूट विश्वास होता, हे सांगताना सोनियांनी १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा दाखला दिला़ त्या म्हणाल्या, पंडितजी नेहमी सांगत की, जिंकलेल्यांनी विजयाची हवा कानात शिरू देऊ नये आणि हरलेल्यांनी निराश होता कामा नये़ जय-पराजयाची पद्धत ही निवडणूक निकालांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे़ चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने हरणे कधीही चांगले. नेहरूंसाठी धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्मांचा आदर हा श्रद्धेचा प्रश्न होता़ धर्मनिरपेक्षतेशिवाय कुठलाही भारतीय, कुठलाही भारत असू शकत नाही़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज आहे़ विविध जातीपंथ असलेल्या, विविध भाषा आणि संस्कृती अशा वैविध्याने नटलेल्या देशाला केवळ संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकारच एकसंघ ठेवू शकते, हे नेहरूंचे विचार काळाच्या कसोटीवर खरे ठरत आहेत़माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस प्रतिनिधी मंडळाचे नेते उद्या मंगळवारी भाषण करतील आणि याचसोबत या संमेलनाची सांगता होईल़
नेहरूंचे द्रष्टेपण जगाला मान्य, धर्मनिरपेक्षता काळाची गरज
By admin | Published: November 18, 2014 12:24 AM