इस्ट गोदावरी: आंध्र प्रदेशातील इस्ट गोदावरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी घरात कैद असलेल्या एका कुटुंबाला वाचवलं. कदाली गावातील या कुटुंबानं कोरोनाच्या भीतीने स्वतःला मागील 15 महीन्यांपासून कैद केलं होतं. अनेकदा आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी जायचे, पण घरातून कुणीच उत्तर देत नसे. यामुळे कुणालाच त्यांच्या परिस्थितीबद्दल काहीच माहिती नव्हती.
कदाली गावाचे सरपंच चोपल्ला गुरुनाथ यांनी सांगितलं की, शेजाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झाल्यामुळे रुथम्मा (50), कांतामणी (32) आणि रानी (30) यांनी स्वतःला 15 महिन्यांपासून घरात कैद केलं होतं. जेव्हा घरकुल योजनेसाठी अंगठ्यांचे ठसे घेण्यासाठी सरकारी अधिकारी त्यांच्या घरी आले, तेव्हा हा प्रकार समोर आला.
यानंतर अधिकाऱ्यांनी हा प्रकार गावच्या सरपंचाला सांगितला. सरपंचाने पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी आले आणि त्या कुटुंबाला बाहेर काढले. पोलिसांनी सांगितलं की, इतके दिवस आत राहिल्यामुळे त्या कुटुंबाची तब्येत खूप बिघडली होती. अनेकांनी बऱ्याच दिवसापासून अंघोळ केली नव्हती, केस कापले नव्हते, चांगलं अन्नही खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्या सर्वांना खूप अशक्तपणा आला होता. त्यांची ती परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं.